Share Market Crash | मंदी आलीय का, SIP वाढवावी का, मार्केट अजून किती कोसळणार? अर्थतज्ज्ञ म्हणाले..
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या आयात शुल्काचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर झाल्याचं दिसून आलं. त्यामध्ये गुंतवणूकदारांना लाखो कोटी रुपये गमवावे लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारामध्ये काहीशी घसरण असल्याचं दिसून येतंय. त्यातच ट्रम्प यांच्या धोरणामुळे टॅरिफ वॉर सुरू होऊन जागतिक मंदी निर्माण होते की काय अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे या काळात SIP थांबवावी का, किंवा पैसे काढून घ्यावेत का? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. तसेच सध्याची परिस्थिती एसआयपीमध्ये नव्याने गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे का? या सर्वांवर सीए आणि आर्थिक सल्लागार रचना रानडे यांनी सविस्तर उत्तरं दिली आहेत.
SIP होल्ड करावी का?
रचना रानडे : सध्याची परिस्थिती ही काही काळापुरती असू शकेल. यातून मार्केट पुन्हा रिकव्हर होऊ शकते. त्याचमुळे सध्या एसआयपी थांबवू नयेत. त्या चालूच ठेवाव्यात. सध्याचा गुंतवणुकीचा पॅटर्न कायम ठेवावा.
आताच्या परिस्थितीला घाबरून जाण्याची गरज नाही. अनेकदा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यातून आपण बाहेरही पडलो आहे. हवेत हेलखावे घेतले म्हणून विमानातून उडी घेत नाही, तशीच मार्केटची सद्यस्थिती आहे. घाबरुन जाऊ नका.